Friday, January 29, 2016

तसे भेटणे ना पुन्हा व्हायचे. .

तसे भेटणे ना पुन्हा व्हायचे. .
उन्हे गात होती जरी त्याक्षणी
तश्यातच मला भेटलेली कुणी 
जरा सावळीशी तनू लाजरी
किती बोलली फक्त नजरेतुनी…
तिचे पास येणे जरी थोडके
जसे सोबती अंतराचे धुके
असा हरवलो त्या क्षणातून मी
तिला पाहतानाच स्पंदन चुके…
तिचा हाती हाती तरी घेतला
खुळा स्पर्श झाला शहा-यातला
उन्हे पेटली भर दुपारी तरी,
इथे मात्र हा गारवा वाढला...
तशी वेळ ती फक्त दोघातली
म्हणूनच मिठीला मिठी मारली
तिच्या बाहुपाशी असा गुंतलो
जणू गाठ रेशिम कुणी बांधली…
फुले श्वास, रोमांच देहावरी
तरी सोडवेना मिठी भरजरी
जरी या क्षणा आठवू पाहतो
तरी आठवे ती मला लाजरी...
खुले केस पाठीवरी सोडूनी
मला भासली ती जणू कामिनी
तिच्या धुंद गंधात गंधाळता
इथे दरवळे भेट हृदयातुनी. .
अधर स्पर्शता लाजली बावरी
"नको ना, नको ना" उगी बोलली
तिचे लाजणे जीवघेणे असे
नकारातही हाय ती हासली. . .
किती शांत एकांत द्यावा तिने
जिच्या सोबती मोहरावी क्षणे
अता फक्त आठव मला यायचे
तसे भेटणे ना पुन्हा व्हायचे…
पूजा भडांगे

No comments:

Post a Comment